Thursday 21 May 2015

आपली प्रार्थना


 प्रतिज्ञा आणि प्रार्थना
संघामध्ये आपण दररोज आपली प्रार्थना म्हणत असतो. मनुष्याच्या जीवनात प्रार्थना अत्यंत आवश्यक आहे. जशी प्रार्थना आवश्यक आहे, तशीच प्रतिज्ञाही आवश्यक आहे. प्रार्थना परमेश्वराची करावयाची असते. प्रतिज्ञेत आपला निर्धार व्यक्त करावयाचा असतो. प्रतिज्ञेत मी अमुक करीनअसा निर्धार असतो, तर प्रार्थना या निर्धाराच्या परिपूर्तीसाठी परमेश्वराला विनंती करावयाची असते. नुसत्या प्रतिज्ञेने अहंकाराची जोपासना होऊ शकते. प्रतिज्ञेत भाव स्वत:च्या कर्तृत्वाचा असतो. नुसत्या प्रार्थनेने देवशरणता येऊ शकते. असेल हरी तर देईल खाटल्यावरीअशी मनोवृत्ती बनू शकते. म्हणून प्रतिज्ञा आणि प्रार्थना या दोहोंची सांगड हवी असते. प्रतिज्ञा आणि प्रार्थना यात स्वत:चा निर्धार आणि त्याच्या सफलतेसाठी परमेश्वराला विनवणी यांची सांगड घातलेली असते. आपल्या संघात या दोन्ही बाबी आहेत.
थोडा इतिहास
आपली प्रार्थना संस्कृत भाषेत आहे. ही प्रार्थना 1940 सालापासून सुरू आहे. पण संघ तर 1925 साली स्थापन झाला होता. तेव्हा प्रार्थना नव्हती काय? प्रार्थना होती. पण ती मराठी हिंदी भाषेत होती. म्हणजे अर्धी प्रार्थना मराठीत तर अर्धी हिंदीत होती. पुढे संघाचा विस्तार होऊ लागला. दक्षिणेतील आंध्र, तामीळनाडू या भागातही संघ सुरू झाला. त्या भागातील स्वयंसेवकांसाठी मराठी-हिंदी भाषेतील प्रार्थना उपयुक्त नव्हती. म्हणून सर्व भारतीय भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेत ती करण्याचे ठरले. 1939 साली, वर्धा जिल्ह्यातील सिंदी या गावी, संघाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली. त्या बैठकीत . पू. डॉ. हेडगेवार, . पू. श्रीगुरुजी, माननीय श्री आप्पाजी जोशी, माननीय श्री बाळासाहेब देवरस प्रभृती संघाचे अधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत, आपल्या प्रार्थनेत कोणते विचार असावेत, याची चर्चा झाली. त्या चर्चेचे फलित म्हणून आजच्या प्रार्थनेचे मराठी प्रारूप तयार झाले. नागपूरला आल्यानंतर त्या प्रारूपाचा संस्कृत अनुवाद करण्यात आला. संस्कृत रूपांतर श्री नरहरी नारायण भिडे यांनी केले. तेव्हा श्री भिडे विज्ञानाचे पदवीधर होते. पण खाजगी रीत्या ते संस्कृतही शिकायचे. त्यांचे गुरू होते महामहोपाध्याय श्री बापूजी ताम्हण. पुढे 1945 साली श्री भिडे यांनी संस्कृतात एम. .ची पदवीही प्राप्त केली. 1940 च्या संघ शिक्षा वर्गापासून ही प्रार्थना म्हणणे सुरू झाले. प्रथम, पुणे संघ शिक्षा वर्गात श्री यादवराव जोशी यांनी ती म्हटली आणि त्यांनीच ती त्याच वर्षी नागपूरच्या संघ शिक्षा वर्गात म्हटली.
प्रार्थनेचे श्लोक आणि वृत्त
आपल्या प्रार्थनेत तीन श्लोक आहेत. पहिला श्लोक ‘‘भुजंगप्रयातया वृत्तात आहे; तर दुसरा तिसरा श्लोक मेघनिर्घोषवृत्तात आहे. भुजंगप्रयातवृत्तामध्ये प्रत्येक ओळीत 12 अक्षरे असतात, तर मेघनिर्घोषवृत्तात प्रत्येक ओळीत 23 अक्षरे असतात. ही ओळ आपण दोन भागात विभागून म्हणत असतो. प्रथम 12 अक्षरे नंतर 11 अक्षरे. एकच ओळ दोन भागात विभागून म्हणण्यात येत असल्यामुळे, अनेकांना वाटते की हे 4 श्लोक आहेत. म्हणून ते समजतात की आपल्या प्रार्थनेत 5 श्लोक आहेतपण हे चूक आहे. श्लोक तीनच आहेत. प्रार्थनेच्या शेवटी भारत माता की जयअसा उद्घोष आपण करीत असतो. तो पूर्वीच्या प्रार्थनेतही होता. हिंदी भाषेतील हा उद्घोष जसाच्या तसाच आपण कायम ठेवला आहे. कारण तो उद्घोष आहे.
आता आपण प्रार्थनेचा अर्थ बघूया.
पहिला श्लोक
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम्
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते
या श्लोकातील शब्द आणि त्यांचे अर्थ असे आहेत.
नम: (नमस्कार), ते (तुला), वत्सले (प्रेमळ), मातृभूमे, त्वया (तुझ्याकडून), हिंदुभूमे, सुखं (सुखात), वर्धित: (वाढविलेला), अहम् (मी). महामङ्गले (अत्यंत पवित्र), पुण्यभूमे, त्वदर्थे (तुझ्याकरिता), पततु (पडो), एष: (हा), काय: (देह), नम: (नमस्कार), ते (तुला), नम: ते.
अन्वय - (हे) वत्सले मातृभूमे, ते सदा नम: (हे) हिन्दुभूमे, त्वया अहं सुखं वर्धित: (हे) महामङ्गले पुण्यभूमे, एष: काय: त्वदर्थे पततु। ते नम:, ते नम:
अर्थ -
हे प्रेमळ मातृभूमे, तुला नित्य माझा नमस्कार असो. हे हिन्दुभूमे, तू मला सुखाने वाढविले आहेस. हे अत्यंत मंगल पुण्यभूमे, माझा हा देह तुझ्याच कार्यासाठी खर्ची पडो. तुला वारंवार नमस्कार असो.
भाष्य -
या श्लोकात मातृभूमीला वंदन आहे. तसे म्हटले तर भूमी काय असते? केवळ जमीनच की नाही! जमीन! दगडाधोंड्यांनी भरलेली. जड, अचेतन. पण एकदा का तिला आपली माता मानली की, मग ती जड राहत नाही. ती अचेतन राहत नाही. कारण ती आपल्याला आपली माता म्हणजे आपली आई वाटते. आई काय जड आणि अचेतन असते? ज्या भूमीवर आपण जन्मलो आणि वाढलो, तिला मातेच्या स्वरूपात बघितले की आपले सारे भावविश् बदलून जाते. बंकिमचंद्रासारख्या भावकवीसाठी ती दशप्रहरणधारिणी दुर्गा’ (म्हणजे दहा शस्त्रे धारण करणारी दुर्गा) होते. कमलदलविहारिणी कमला’ (कमलवनात विहार करणारी लक्ष्मी) बनते आणि विद्यादायिनी वाणी’ (विद्या प्रदान करणारी सरस्वती) होते. जे लोक आपल्या जन्मभूमीला मातृभूमी मानतात, त्या लोकांचेच राष्ट्र बनत असते. आपल्या या भूमीचे नाव हिंदू भूमीम्हणजे हिंदुस्थान आहे. आपण अलीकडे तिला भारतया नावाने अधिक ओळखतो. त्यात वावगे काहीच नाही. पण या भारतभूमीवर हिंदू लोक राहतात. म्हणून या देशाचे नाव हिंदुस्थान आहे. तसा भारतशब्द आपल्या देशाच्या विस्ताराचा वाचक आहे.
‘‘उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संतति:
म्हणजे - ‘‘समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला जो प्रदेश आहे त्याचे नाव भारतआहे; आणि तेथे राहणारे लोक भारती होत.’’ पण हिंदुस्थान हा शब्द या भारताचे गुणवर्णन करणारा आहे. त्याच्या उच्च संस्कृतीची आठवण करून देणारा आहे. कारण ते लोकांचे नाव आहे.
ही आपली मातृभूमी अत्यंत मंगल आहे. ती पुण्यभमी आहे; तिच्याकरिता जगण्यात आणि तिच्याकरिता मरण्यात आनंद गौरव आहे. म्हणून म्हटले आहे की हा माझा देह तिच्या कामी येवो. देह नश्वर आहे. तो जाणाराच आहे. पण आपल्या मातृभूमीसाठी तो नष्ट होण्यात जीवनाचे सार्थक आहे.
नमस्ते, नमस्ते, - असा दोनदा उल्लेख आहे. त्याचा अर्थ होतो वारंवार नमस्कार.

                                          -मा. गो. वैद्य


No comments:

Post a Comment